03/02/2016
दि.31 जानेवारी रोजी 'गोवन वार्ता' या वर्तमान पत्रात.. जेष्ठ कवयित्री,गझलकारा Radha Bhave यांनी प्रसिध्द गजलकार व दिंद्रुड नगरीचे जावाई सतीश दराडे यांच्यावर लिहिलेला लेख..
भावेताई दंडवत...
कालचा एफबीवरील लेखाचा फोटो नीट वाचता येत नव्हता म्हणून संपूर्ण लेख टाईप करुन पोष्ट करतोय.अप्रतीम लिहिलेय भावे ताईंनी आवर्जून वाचा.
अश्रू पिणे शिका हो पाणी पुरेल कुठवर??
सतीश दराडे..चारचौघात भोळाबावरा चेहरा करून वावरणा-या या तरूणाच्या भात्यात थेट काळजात घुसून खोल जखम करणारे शेररुपी तीर भरलेले असतील,याचा अंदाज याच्या रचना प्रत्यक्ष वाचल्या ऐकल्याशिवाय येऊच शकत नाही. मुशाय-यातील याचे सादरीकरण हाही रसिकांसाठी एक अद्भुत,रोमांचक अनुभव असतो.
मी रोखठोक माझ्या आत्म्यास प्रश्न केला
देहात राहिल्याचा देतो कधी किराया..
असा रोखठोक सवाल करणारा हा अकोल्यातील अतिशय लोकप्रिय कवी,गझलकार.
"श्वासांच्या समिधा"हा त्यांचा गझल संग्रह रसिकांच्या पसंतीस उतरला आहे.त्यांच्या अनेक उत्तम रचना वाचनात आल्या आहेत.तरीही सर्व प्रथम वाचलेली आणि मनावर अमिट ठसा उमटवलेली ही गझल सर्वांनाच आवडेल अशी आहे.
शेतीप्रधान देशा दे एवढेच उत्तर
केव्हा भिजेल अमुची डाळीत पूर्ण भाकर...
आपण काही काही शब्द आणि त्यांचे अर्थ इतिहासाची साक्ष काढत चलनी नाण्यांसारखे वापरत असतो.
'शेतीप्रधान देश' हे त्यातलेच एक उदाहरण. आज आपल्या देशात शेती आणि शेतकरी यांची अवस्था पहाता क्रुषीवलांचा देश म्हणून गौरवण्यासाठी काहीही राहिलेले नाही. उलट पिकवणा-याच्या नशीबी उपाशी, अर्धपोटी रहाणे आलेय.या लाजीरवाण्या अवस्थेस नेमके कोण जबाबदार आहे. किंवा ही अवस्था बदलू शकणारा उपाय कोणता. या प्रश्नापेक्षाही येथील बहुसंख्य माणसाला पडलेला प्रश्न हाच आहे की डाळ आणि भाकर हे एवढेच त्याच्या द्रुष्टीने असणारे पूर्णान्न त्यांना कधी लाभणार?
जी गोष्ट अन्नाची तीच पाण्याचीही.
दराडे लिहितात..
गावामधे सकाळी मी ऐकिली दवंडी
अश्रू पिणे शिका हो पाणी पुरेल.कुठवर..?
तलाव,विहिरी, नदी,झरे आटत चाललेत.पिकांसाठी नव्हे तर पिण्यासाठीही पाणी नाही. अशी कित्येक गावांची अवस्था आहे. अश्रू पिण्याशिवाय पर्याय नाही.
जगणे रडगाणे होऊन गेलेय.ही जाणीव कवीच्या मनाला दवंडी बनून छळतेय.पाणी हा केवढा महत्त्वाचा प्रश्न आहे आणि तो किती अक्राळ विक्राळ रूप होत घेत चाललाय हेच दराडेंना इथे अधोरेखित करायचे आहे.
पुढचा शेर..
भोळेपणा तिचा मी सांगू किती तुम्हाला
ती मोजते वितीने ता-यांमधील अंतर...
कवी ज्या जगात वावरतोय.तिथे अन्नाची पाण्याची वानवा तर आहेच. शिवाय तिथे हुशारी, चातूर्य,चालाखी याचाही अभाव आहे.ता-यातील अंतर वितीने मोजून ते अगदी खरेही आहे या भोळ्या भ्रमात जगणारी साधी माणसे स्वत:पुरतेच आभाळ रेखून घेतात.स्वतःपुरतीच उत्तरे मांडतात. आणि त्या उत्तरावर खूशही असतात. आपल्या ठरलेल्या परिघापलिकडच्या जगाशी त्यांचे देणेघेणे नसते. अज्ञानातील सुखातच त्यांचे आयुष्य संपून जाते.असे जरी असले तरी, या कवीचा स्वतःच्या क्षमतेवर पूर्ण विश्वास आहे. जीवणाच्या शाळेत अनुभव नावाच्या गुरुकडून तो खूप शिकलेला तर आहेच.शिवाय त्याच्या अंगभुत प्रज्ञेच्या जोरावर एका रात्रीत आभाळ वाचण्याचा,आयुष्याच्या अवकाशातील अनेक प्रश्नांना भिडण्याची,त्यांची उत्तरे शोधण्याची ताकद तो बाळगून आहे. अर्थात त्याची ही क्षमता आणि जाण व्यावहारी जगाच्या पटावर निरक्षरतेचा शिक्का घेऊन बसते. अर्थात पुस्तकी ज्ञान आणि ते मिळवल्याचा पुरावा म्हणून दिले जाणारे प्रमाणापत्र हाच माणसाच्या बुद्धीमान,ज्ञानी असण्याचा मापदंड म्हणून मानला जातो. तिथे दुसरे काय घडणार? म्हणूनच गझलकार सतीश दराडे म्हणतात.
रात्रीत फक्त एका आभाळ वाचले मी
सर्व्हेक्षणात त्यांच्या ठरलो तरी निरक्षर...
माणूस आणि त्याचे जगणे, वाचणा-या कवीला भोवतीच्या वस्तुस्थितीचे जसे भान आहे. तसेच स्वताच्या असण्या आणि जगण्यामागच्या प्रेरणेचीही नेमकी जाण आहे. ते पुढील शेरात म्हणतात.
मी जन्मलो जगाचे अश्रू पुसावयाला
का पुण्यवान होऊ तुमचे पुजून पत्थर.??
कुठल्याही कर्मकांडात न अडकता केवळ माणसांच्या सुखदु:खांशी त्यांना जोडलं जायचंय.अश्रू पुसण्याइतकी,त्यांचा आधार होण्याइतकी दुसरी पूजा नाही. हे त्यांनी जाणलेय.म्हणूनच दगडाचा देव पुजून तथाकथीत पुण्य जोडण्याची कल्पनाही त्यांना सहन होत नाही.
डोळ्यात साकळावा सारांश काळजाचा
प्रेमात वेळ नसतो बोलायला सवीस्तर...
प्रेम उत्कट प्रेम.. त्याची भाषाच निराळी. त्या भाषेला शब्दांचा आधार लागतोच असे नाही. आपल्या अस्सल भावभावना आपल्या एखाद्याची ओढ मूकपणेही सांगता येते.किंबहुना शब्दाच्या फापटपसा-यात तिला मिसळूही नये.त्यात वेळ घालवू नये. आपल्यातील सारे आर्त आपल्या नजरेत आपल्या डोळ्यात साकळून येते तेव्हा ते विनासायास योग्य व्यक्ती पर्यंत पोचते.असे या गझलकाराला म्हणायचे असावे.
सामान्यत: स्वतःचे घर हे अताशा प्रत्येकाचे स्वप्न असते. त्या ध्यासापायी काडीकाडी जमवत रहाणे.काबाडकष्ट करत रहाणे,यातच बरेचशे आयुष्य संपून जाते. चिमणी ज्या सहजतेने दरवर्षी घरटे बांधते ती सहजता माणसाच्या वाट्याला येत नाही. एक घर उभे करण्यासाठी अनेक तडजोडी कराव्या लागतात. प्रसंगी ज्याच्या जिवावर जगलो,वाढलो तो जमिनीचा तुकडा, ते वावरही विकून टाकावे लागते.या भयान वास्तवाचे बिंब पुढील शेरात दिसते.
तू बांधतेस चिमणे दरसाल एक खोपा
मी एक प्लॉट घ्याया आलो विकून वावर...
कवीता आणि गझले इतक्याच ताकदीने ललीत लेख लिहिणारे सतीश दराडे.मनात साठलेले अनेक अनुभव,जाणिवा,समश्या,प्रश्न आणि भोवतीचे बोचणारे वास्तव समर्पक शब्दात पकडून ते चमकदार शेरात परावर्तीत करतात.रसिकांना रिझवणारी,अचंबित करणारी ही त्यांची प्रतिभा नक्कीच गौरवास्पद आहे.
सगळ्या हौशी दु:खांची मग दाटीवाटी होते
माझ्या एकांताची सांजेला चौपाटी होते..
या शब्दात हा गझलकार सांजवेळी दाटून येणा-या घेरून टाकणा-या दु:खाच्या गलबलाटाविषयी बोलतो.तेव्हा या एकांताची चौपाटी होण्याचा अनुभव एका सतीश दराडेचा न रहाता तो शेर ऐकणा-या प्रत्येकाचा होतो. या गझलकाराच्या शब्दांचे गारुड मग कितीतरी दिवस उतरतच नाही..
- राधा भावे,गोवा