20/07/2025
आपण बऱ्याचदा चित्रपटांमध्ये हिरो म्हटलं की लगेच डोळ्यासमोर एक देखणा, स्मार्ट, श्रीमंत आणि six-pack असलेला माणूस उभा राहतो. बॉलिवूडमध्ये तर हे जास्तच दिसून येतं. बऱ्याच हिंदी चित्रपटांमध्ये हिरो हा नेहमी श्रीमंत, स्टायलिश आणि मोठ्या गाड्यांमध्ये फिरणारा दाखवला जातो. त्याच्या लुक्स आणि स्टाईलला जास्त महत्त्व दिलं जातं. पण अभिनयाकडे बऱ्याचदा दुर्लक्ष केलं जातं.
पण धनुषसारखे काही कलाकार आहेत जे याला अपवाद ठरतात. अलीकडे आलेल्या कुबेरा या चित्रपटात धनुषने भिकाऱ्याची भूमिका साकारली आहे. हा रोल त्याच्यासाठी खूपच वेगळा आणि आव्हानात्मक होता. ही भूमिका करताना धनुषने खरंच भिकाऱ्यासारखं जगलं आहे. चेहऱ्यावरील हावभाव, डोळ्यातील दुःख, आणि त्याच्या हालचालींमधून तो भिकाऱ्याचा जीवन जगतोय असं वाटतं. हे पाहताना प्रेक्षक धनुषला विसरून जातात आणि फक्त त्या पात्राला पाहू लागतात. हेच खऱ्या कलाकाराचं लक्षण आहे.
टॉलीवूड किंवा तामिळ चित्रपटांमध्ये अशा अभिनयाला जास्त महत्त्व दिलं जातं. उदाहरण द्यायचं झालं तर थंगालन चित्रपटात विक्रमने साकारलेली भूमिका पाहा. त्याने आपल्या लूकपेक्षा पात्राच्या गरजेवर लक्ष दिलं. त्याचप्रमाणे विक्रम वेधा मधील विजय सेतुपतीने आपल्या अभिनयातून खऱ्या खुऱ्या गुन्हेगाराची भूमिका जिवंत केली. हे दोघंही स्टार असूनही त्यांनी स्टारडम मागे ठेवून पात्र जपलं.
धनुष हा देखील असाच कलाकार आहे. तो केवळ हिरो दिसण्यासाठी पडद्यावर येत नाही, तर पात्र जगण्यासाठी येतो. कुबेरा मधील त्याचा भिकाऱ्याचा रोल हेच दाखवतो.
बॉलिवूडने आणि प्रेक्षकांनी हे शिकण्याची वेळ आली आहे – हिरो हा केवळ श्रीमंत किंवा स्टायलिश दिसणारा नसतो, तर तो आपल्या अभिनयाने मनात घर करणारा असतो.