28/06/2026
*संकल्पाची प्रचिती: श्रद्धा आणि विज्ञानाचा अद्भुत संगम*
तसा मी विज्ञानवादी मनुष्य.
मात्र, विज्ञानामुळे मिळालेले अविष्कार मनाला उन्माद देऊ नयेत म्हणून *'हे असे का बुवा?'* ही प्रामाणिक श्रद्धा बाळगणाराही मी.
परंतु, आयुष्यात काही अनुभव असे येतात, जे तुमच्या तर्काची चौकट मोडून टाकतात. बुद्धी ज्या गोष्टीला 'अशक्य' म्हणून नाकारते, तिथे मन एका अनाकलनीय ऊर्जेची अनुभूती घेत असतं. असाच एक भन्नाट आणि विचार करायला लावणारा अनुभव नुकताच मी प्रवासाच्या वाटेवर घेतला.
तो गुरुवारचा दिवस (२५/०६/२०२६) होता.
आमचं सांगलीला जाण्याचं नियोजन पूर्ण झालं होतं.
सकाळी ११ ते सायंकाळी ५ असा २६० किलोमीटरचा प्रवास एकट्याने ड्रायव्हिंग करत करायचा होता.
माझी बायको, मुलगी, माझे वडील, सोबत एक आत्येभाऊ असे आम्ही सगळे निघालो.
सांगलीत एक महत्त्वाचं खाजगी काम आणि त्यानंतर पुढे देवदर्शन... मनाची ओढ तीव्र होती, पण शरीराने मात्र दगा दिला होता. घरातून निघतानाच अंगात ताप भरला होता, कणकण जाणवत होती.
वडील थकले असल्याने 'स्टीअरिंग' त्यांच्या हातात देणे शक्य नव्हते.
आत्येभाऊ म्हणाला, "तुझी गाडी मला जमणार नाही."
माझा पाय एक्सलेटरवर पडला आणि गाडी सांगलीच्या दिशेने धावू लागली.
गुरुवारचा प्रवास संपला, कामं झाली, पण संध्याकाळ होता होता अंगातला ताप कमालीचा वाढला.
एका हॉटेलवर आम्ही थांबलो.
रात्री ११.३० ते पहाटे ४ चा तो काळ... शरीर तापाने फणफणत होतं,
अंग ठणकत होतं.
वडील म्हणाले, "एखादी डोलो किंवा क्रोसीन खा, बरं वाटेल."
मी म्हटलं, "नको! वाटेल थोड्यावेळाने बरं."
एरवी मला जेव्हा कधी ताप येतो, तेव्हा तो किमान तीन दिवस तरी शरीराचा ताबा सोडत नाही, हा माझा आजवरचा वैद्यकीय इतिहास!
त्यातच पहाटे ४ वाजता जेव्हा डोळे उघडले, तेव्हा शरीराची अवस्था पाहून मन हताश झालं.
"गोळी खाल्ली असती तर बरं झालं असतं; बहुतेक या अवस्थेत आता देवदर्शन होणे अवघड आहे..."
असे मी स्वतःशीच बोललो.
तो विचार मनाशी बोलून मी पुन्हा डोळे मिटले. ती केवळ हार नव्हती, तर ते एक 'समर्पण' होतं. *'आता सगळं तुझ्यावर सोपवलंय'* असा तो भाव असावा.
सकाळी ६ वाजता जेव्हा मला जाग आली, तेव्हा मी थक्कच झालो. अंगातला ताप कुठल्या कुठे गायब झाला होता. डोकेदुखी नाही, थकवा नाही... मी अगदी 'ठणठणीत' बरा झालो होतो!
इतका की, शुक्रवारच्या दिवशी मी तब्बल ६०० किलोमीटर गाडी चालवली, पण कुठेही थकव्याचा लवलेश नव्हता.
हा नेमका काय प्रकार होता?
'निव्वळ विज्ञान' की 'प्रबळ श्रद्धा' ?
माझं मन याला केवळ विज्ञानाचा नियम मानू शकत नाही आणि डोळे झाकून श्रद्धा करत बसणं माझ्या सदसद्विवेकबुद्धीला पटतं नाही.
कारण, विज्ञानानुसार आजारपणातून बरं व्हायला शरीर आपला ठराविक काळ घेतंच.
पण, इथे विज्ञानाने 'टर्बो मोड' पकडला होता. जेव्हा तुम्ही एखाद्या ध्येयासाठी, कामाच्या ओढीने निघता तेव्हा मनाची 'संकल्प शक्ती' सर्वोच्च पातळीवर असते.
पहाटे ४ वाजता मी जेव्हा परिस्थिती पूर्णपणे स्वीकारून शांत झालो, तेव्हा शरीराने स्वतःला पूर्णपणे 'हीलिंग मोड'वर टाकलं असावं.
यालाच *मनाचा शरीरावर असलेला अथांग प्रभाव म्हणत असावे.*
माझ्याकडे या अनुभवाचं अंतिम उत्तर नाही.
पण एवढं मात्र निश्चित सांगू शकतो की, त्या दिवशी मी विज्ञान आणि श्रद्धा यांना एकमेकांच्या विरोधात उभं राहिलेलं पाहिलं नाही; उलट दोघेही एकाच दिशेने कार्य करत असल्याची अनुभूती घेतली.
हा केवळ एक प्रवास नव्हता.
तो मनाचा, शरीराचा, संकल्पशक्तीचा आणि त्या सर्वांना जोडणाऱ्या एका अदृश्य ऊर्जेचा साक्षात्कार होता.
-अमोल काळे
© Amol Kale
Email: [email protected]