17/05/2022
तर्कसंगत...
ज्ञानवापी, मराठे आणि मशिदीसमोरचा नंदी..
अहिल्याबाईंनी नवं मंदिर उभारलं तरी जुना नंदी तसाच का ठेवला? Prashant दादांनी हा प्रश्न उपस्थित केल्यावरून, त्यामित्ताने हे थोडंसं.
नानासाहेब बंगालवर स्वारी करून गेले तेव्हा १७४२ मध्ये त्यांनी स्वतः / मल्हारराव होळकरांना ज्ञानव्यापी पाडण्यासाठी पाठवलं. त्यात ज्ञानवापी असा स्पष्ट उल्लेख आहे होळकरांच्या कागदात. यावेळेस पेशव्यांजवळ जवळपास ऐंशी हजार फौज होती, पण काशीतल्या ब्राह्मणांनी, विशेषतः दीक्षित कायगावकरांनी नानासाहेबांचे पाय धरले की "तुम्ही परत गेलात तर इथे जवळ असलेला अयोध्येचा नवाब आम्हाला जगू देणार नाही, त्याने धमकी दिलीय तशी". इथे ब्राह्मण म्हणजे सगळ्या हिंदूंवर ही टाच आली असती. अयोध्येचा तत्कालीन नवाब सफदरजंग हा नुकताच गादीवर आलेला, आणि तो बादशहाजाद्याचा मित्र होता. नानासाहेबांना हे प्रकरण सोडून द्यावं लागलं. बाजीरावांनी मृत्यूसमयी सुद्धा विश्वेश्वर आपल्याकडे यावा अशी इच्छा व्यक्त केली होती. यानंतर जवळपास वीस वर्षे, नानासाहेब हे सामोपचाराने काशी मथुरा वृंदावन आणि अयोध्या वगैरे आपल्याकडे यावी या विचारात होते. केवळ ही स्थळे घेऊन चालणार नव्हतं, याभवतालचा प्रदेश आधी निर्धोक होणं गरजेचं होतं. नानासाहेबांची दत्ताजी जयाप्पा वगैरेंना सतत पत्रं होती की बंगाल बिहार निर्वेध करावा.
पुढे महादजी शिंदे यांनी आणि अहिल्याबाई होळकर यांनी प्रयत्न केले, पण पानिपतच्या आसपास अयोध्येच्या नवाबांनी जो पवित्रा घेतला तो चकित करणारा होता. नानासाहेबांनी सफदरजंगला आपल्या बाजूने केलेलं हळूहळू पण त्याचा मुलगा शुजा उलटला. यापूर्वीचा नवाब सादतखान हा तर मराठ्यांचा कट्टर शत्रू होता.
सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे एखाद्या ठिकाणी जनमानस आपल्या बाजूने असणं गरजेचं असतं तरच जागा टिकते. तरीही पाटीलबावांनी बऱ्यापैकी हा प्रदेश निर्धोक केला, आणि अहिल्यादेवींनी इथे मंदिर बांधलं. अंदाज असा आहे की मूळ मंदिर जिथे होतं तिथला नंदी हलवणे हे धर्मशास्त्राला धरून झालं नसतं. शिवाय, नंदी तिथेच ठेवणे म्हणजे पुढेमागे मंदिर मुक्त करण्याची एक सोय असंही होऊ शकतं, म्हणजे पुढच्या पिढ्यानपिढ्या, जोवर मुक्तता होत नाही तोवर नंदी जिथे आहे ते मंदिर हे उघड होईल. शिवाय, बाजूला प्रतिकात्मक विश्वेश्वर उभा राहिल्याने इतरांवरही थोडा वचक बसेल. अहिल्याबाईंनी याच वेळेस माणिकर्णिका घाट, दशाश्वमेध घाट वगैरेंची पुनर्बांधणी केली. दुर्दैवाने, याच सुमारास काही वर्षात, खुद्द पेशवे घराण्यात कोणीही खासा खमक्या माणूस नव्हता, एकटे नाना कारभारी होते. त्यात शिंदे घराण्यात पाटीलबावा गेले, होळकरांच्या अहिल्याबाई गेल्या आणि तुकोजी अर्धांगवायूने बेजार झाले. त्यामुळे कदाचित पुढे अनेकांची इच्छा आणि योग्य वातावरण असूनही नेतृत्व नसल्याने काही होऊ शकलं नाही.
- कौस्तुभ कस्तुरे
#इतिहासाच्या_पाऊलखुणा